कश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 56 टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात 6 जिह्यांतील 26 जागांसाठी बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झाले. जम्मू विभागातील श्री माता वैष्णोदेवी जागेवर सर्वाधिक 79.95 टक्के मतदान झाले. त्यानंतर पूंछ-हवेली (72.71), गुलबगढ (राखीव, 72.19) आणि सुरनकोट (72.18) असे मतदान झाले.

कश्मीर खोऱ्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी खानसाहेब येथे 67.70 टक्के इतकी नोंदवली गेली. त्यापाठोपाठ कंगन (राखीव) 67.60 टक्के आणि चर-ए-शरीफ 66 टक्के होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्रीनगर येथे अवघे 27.31 टक्के मतदान झाले. तर हब्बाकडलमध्ये सर्वात कमी 15.80 टक्के मतदान झाले.

गांदरबल आणि बिरवाह अशा दोन मतदारसंघांतून लढणारे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज त्यांची मुले झहीर आणि जमीर, वडील फारुख अब्दुल्ला यांच्यासमवेत येऊन मतदान केले. राज्यात तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हरियाणा आणि जम्मू कश्मीरची मतमोजणी 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.