नागपुरातून वर्षभरात 559 लाडक्या लेकी बेपत्ता!

बदलापूर, कल्याण येथील अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. उच्च न्यायालयाने याबाबत सरकारला कठोर उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. मात्र, वास्तवात महाराष्ट्राची उपराजधानी तसेच गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात लाडक्या लेकाRच्या सुरक्षेचा ‘थांगपत्ता’ नसल्याचे चित्र आहे. शहरात प्रेमसंबंध, अनैतिक संबंध अशा घटनांचे सत्र वाढले असून वर्षभरात तब्बल 559 मुली व महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभरात मागील दोन वर्षांपासून अल्पवयीन मुली-तरुणी व विवाहित महिला घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दररोज तीन ते चार मुली-महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. गेल्या वर्षभरात नागपूर शहरातून मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या 559 प्रकरणांची नोंद झाली. त्या बेपत्ता झालेल्या 559 पैकी 515 जणींचा पोलिसांनी शोध घेतला आणि त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. मात्र तशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्याकामी पोलीस यंत्रणा तोकडी पडली आहे. गृहमंत्र्यांच्या शहरातच महिलांच्या सुरक्षेपुढे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही आकडेवारी असल्यामुळे महिला संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

बेपत्ता मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग स्कॉड’ नावाने तीन पोलीस कर्मचाऱयांचे पथक कार्यान्वित आहे. त्यामुळे महिला वा मुलीपैकी कुणी बेपत्ता झाल्याची नोंद झाली की ते पथक सक्रिय होते. राज्यभरातून किंवा परप्रांतातून हे पथक बेपत्ता झालेल्या मुली, महिलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवते, अशी माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

शहरातून वर्षभरात 372 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील काही मुलींना अनैतिक धंद्यांमध्ये लोटण्याचा प्रयत्न झाला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडील 42 गुह्यांत 44 बालकांचा शोध लागला. त्यात 13 मुले, 31 मुलींचा समावेश होता.