दीड तास योगा केल्यानंतर 54 वर्षाच्या योग प्रशिक्षकाचा सायलंट हार्ट अटॅकने मृ्त्यू

उत्तर प्रदेशमध्ये योग प्रशिक्षक पवन सिंघल यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पूर्वी त्यांनी दीड तास योगा केला होता, तसेच तीन किमी चालले होते. योगा शिकवण्यासाठी ते प्रशिक्षण केंद्रात जात होते, तेव्हा गाडीतच त्यांचा मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते.

उत्तर प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यात योग आचार्य पवन सिंघल हे योगा शिकवायचे. पेशाने ते पशू चिकित्सक होते आणि गेली अनेक वर्ष ते योगा शिकवत होते. रविवारी पहाटे ते दोन वाजता उठले. दीड तास त्यांनी योगा केला आणि तीन किमी चालले. त्यानंतर आपल्या कारने ते योगा शिकवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात चालले होते. पण रस्त्यात त्यांची कार लोकांना दिसली. तेव्हा सिंघल हे बेशुद्धावस्थेत कारमध्ये लोकांना आढळले. लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायलंट हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पवन सिंघल यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगासाठी वाहून दिले होते. सिंघल दररोज तीन ते चार किमी धावायचे. एक ते दीड तास योगा करायचेय 11 तासांत 100 किमी पळण्याचा आणि 8 तासांत 3600 सुर्य नमस्कार करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 17 वेळा रक्तदान केले होते.