
नवोदय विद्यालय समितीमार्फत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी १८ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २५ मार्च रोजी लागला आहे. त्यात जिल्हा परिषद शाळांनी विक्रमी यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ६० जागांपैकी ५४ जागांवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यात सर्वाधिक एकट्या अकोले तालुक्यातील 14, तर नेवासा तालुक्यातील 8, कर्जत तालुक्यातील ६ तर श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा नगर जिल्हा परिषदेच्या शाळेने नवोदय परीक्षेत एवढे मोठे यश मिळवले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षणाच्या गुणवत्तेचा आलेख वधारल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून ‘मिशन आरंभ’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नवोदय प्रवेशातील यशात दिसून येत आहे.
मार्च २०२४ मध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘मिशन आरंभ’ परीक्षेतून 518 विद्यार्थ्यांची जिल्हास्तर गुणवत्ता यादीत निवड झाली होती. या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे वर्षभर ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील पात्र झालेले हे 54 विद्यार्थी | एकूण 31 शाळांमधील आहेत. पात्र विद्याथ्यापैकी ७ विद्यार्थी इस्रो शैक्षणिक सहलीसाठीही पात्र झाले होते.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मी पात्र ठरेल, याची खात्री | होती. मार्च 2024 मधील चौथीच्या मिशन आरंभ परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. त्यामुळे आत्मविश्वास होता. माइया वर्गशिक्षकांनी 150 सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. इस्रो शैक्षणिक सहलीसाठी केलेल्या तयारीचाही मला फायदा झाला.
– समर्थ ढेरे, विद्यार्थी, जि. प. शाळा, सौंदाळा, ता. नेवासा
‘नवोदय’चा चढता आलेख
नवोदय’साठीचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. वर्ष २०२२ मध्ये ३८ विद्यार्थी, वर्ष २०२३ मध्ये ४२ विद्यार्थी, वर्ष २०२४ मध्ये 48विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आता वर्ष २०२५ मध्ये थेट ५४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील जागांवर झेडपीचे वर्चस्व
नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन या ठिकाणी प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६० जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या होत्या. यातील ५४ जागा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या आहेत. हे प्रमाण एकूण जागांच्या ९० टक्के आहे.
तालुकानिहाय पात्र विद्यार्थी
अकोले १४, नेवासा ८, कर्जत ८, श्रीगोंदा आणि शेवगाव प्रत्येकी ५, संगमनेर, पारनेर आणि जामखेड प्रत्येकी ४, नगर, राहुरी, कोपरगाव आणि श्रीरामपूर प्रत्येकी १, तर राहाता आणि पाथर्डी तालुक्यातून एकाही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.