उत्तर प्रदेशात दररोज 50 हजार गायींची कत्तल, भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

उत्तर प्रदेशमध्ये दररोज 50 हजार गायींची कत्तल होत असल्याचा धक्कादायक दावा सत्ताधारी भाजपचेच आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केला. मुख्य सचिवांसह अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराने हे चाललंय. हे बोललो म्हणून माझी हत्याही होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या गायींच्या हत्तेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. याआधी गाय कापायची कुणाची हिंमत नव्हती. मात्र आमचे सरकार असतानाही आता राजरोसपणे राज्यात दररोज 50 हजार गायी कापल्या जात आहेत. ह्या लोकांनी गायी कापून कापून सगळ्या गायी साफ केल्या. गाझियाबादमध्ये पोलिसांमधील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. कोणतीही भीती न बाळगता पोलीस पैसे घेत आहेत. भ्रष्टाचारामुळे आम्ही गाझियाबादचे पोलीस आयुक्त हटवण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा आश्वासन दिले. मात्र याबाबत कार्यवाही झालेली नसल्याचे ते म्हणाले.

चारो तरफ लूट मची है!

  • गायींच्या कत्तलीसाठी पोलीस, अधिकाऱयांकडून पैसे घेतले जात आहेत. चारो तरफ लूट मची है! आणि या सगळ्यांचा मुखिया चीफ सेव्रेटरी आहे. त्यांच्याच आशीर्वादाने भ्रष्टाचार करून गायी कापल्या जात आहेत. आमचे त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. मात्र त्यांच्याकडून होत असलेल्या कामाचा निषेध आहे.
  • भ्रष्टाचाराने गब्बर झालेल्या चीफ सेव्रेटरींची हिंमत इतकी वाढली आहे की ते आमचीही हत्या करतील. यासाठी 9 एमएमच्या 25 पिस्तुलची खरेदीही झाली आहे, असा धक्कादायक खुलासाही गुर्जर यांनी केला.

एकवेळ अशी होती, गायीची कत्तल करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, मात्र आता आमचं सरकार असूनही राजरोसपणे गायींची कत्तल केली जात आहे. सरकार काहीच करत नाही. अधिकारी विकले गेलेत. गायींच्या नावाखाली पैसे खात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेशही ते मानत नाहीत. – नंदकिशोर गुर्जर