
एकीकडे सरकार ‘स्वच्छता अभियाना’वर मोठा खर्च करीत आहे. मात्र जागोजागी थुंकणाऱ्यांना रोखण्यात प्रशासन हतबल ठरत आहे. रेल्वे स्थानक परिसरात कुठेही थुंकले जाते. त्या बेशिस्त प्रवाशांना ताळ्यावर आणण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. रेल्वे स्थानक परिसरात थुंकणाऱ्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या क्लीन अप मार्शलच्या धर्तीवर कारवाई केली जाणार आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पान आणि गुटखा खाऊन जागोजागी थुंकण्याचे सत्र थांबलेले नाही. स्थानक परिसरात थुंकण्यास मनाई असल्याच्या सूचना लिहिलेल्या आहेत. त्या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. कठोर कारवाई केली जात नसल्यामुळे अनेक प्रवासी बेशिस्त वागतात. या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई कठोर करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या कमर्शियल विभागाने घेतला आहे. त्यानुसार रेल्वे कायद्याच्या कलम 198 अंतर्गत तरतुदीखाली कारवाई करताना थुंकणाऱ्या प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांत 100 ते 200 रुपयांचा दंड आकारला जात होता. स्थानकांची स्वच्छता ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘डेप्युटी स्टेशन सुपरवायझर कमर्शियल’ची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.