बंगळुरुत केक खाल्ल्यानंतर 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आईवडिलांची प्रकृती चिंताजनक

केक खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बंगळुरूत उघडकीस आली आहे. तर आई-वडिलांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बंगळुरूतील भुवनेश्वरी नगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी केपी अग्रहारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाचे वडील स्विगी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आहेत. रविवारी एका ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्यानंतर स्विगी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह बलराज यांनी तो केक घरी आणला. यानंतर रात्री त्यांनी पत्नी आणि मुलासोबत जेवण केले. मग केक खाल्ला. यानंतर तिघेही रात्री झोपून गेले.

सोमवारी पहाटे सर्वांना पोटात तीव्र वेदना होऊ लागली. शेजाऱ्यांनी तिघांना रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत पाच वर्षाच्या धीरजचा मृत्यू झाला होता. तर बलराज आणि त्यांची पत्नी नागलक्ष्मीची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अन्नातून विषबाधा झाल्यानेच धीरजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र नेमके कोणत्या पदार्थामुळे विषबाधा झाली हे समजू शकले नाही. या घटनेबाबत स्विगीने शोक व्यक्त केला असून तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.