एअर इंडिया कॉलनीत अनेक दशकांपासून वास्तव्यास असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्यासाठी अत्यंत अमानुष वागणूक दिली जात आहे. घरे रिकामी करण्यासाठी फक्त 48 तासांची नोटीस दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आज केला.
एअर इंडिया कॉलनीतील लोकांना घराबाहेर काढले. लहान मुलांसह अनेकजण घरात आत असतानाही त्याची दखल न घेता अधिकाऱ्यांनी घरे सील केली आहेत. एअर इंडिया कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून हाच प्रकार सुरू आहे. घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक रहात आहेत, अनेकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांची पर्वा न करता घरे खाली केली जात आहेत, त्या सर्वांनी कुठे जायचे हा प्रश्न आहे. एअर इंडिया वसाहतीतील लोकांना घराबाहेर काढले. वर्षा गायकवाड यांनी रात्री रस्त्यावर थांबून त्यांच्याकडून माहिती घेतली.
अदानींना ठेवण्यासाठी सरकारचे हे अपमानजनक आणि संतापजनक वर्तन आहे. हे फक्त एअर इंडिया कॉलनी किंवा धारावीपुरते मर्यादित नाही हे मुंबईकरांनी लक्षात घेतले पाहिजे. हे मुंबई शहराबद्दल आणि आपल्या सर्वांच्या घरांबद्दल आहे. यापुढे अशाच अमानुष पद्धतीने घरे खाली केली जातील. पेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर हे असे घडत असेल तर उद्या ते आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. म्हणून या हुकूमशाहीविरोधात एकत्र येण्याची गरज आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, महायुती सरकारने पोलीस आणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना अदानीच्या माणसांना हवे ते करू द्यावे आणि नागरिकांना मदत करू नये असे सांगितले आहे. – खासदार वर्षा गायकवाड