
खोटय़ा खुनाच्या आरोपा- खाली तब्बल 47 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर न्यायालयाने एका 89 वर्षीय वृद्ध व्यक्तीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आयुष्यातील 47 वर्षे तुरुंगात वाया गेल्याने जपान सरकार या व्यक्तीला नुकसान भरपाई म्हणून 12 कोटी रुपये देणार आहे. इवाओ हाकामाता असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. 1968 साली हाकामाता यांना अटक करण्यात आली.
हाकामाता यांनी 2014 पर्यंत तुरुंगात शिक्षा भोगली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जपानमधील शिझुओका शहरातील न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले. 1966 साली त्यांच्यावर बॉस, पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच घराला आग लावून पैसे चोरल्याचा आरोप ठेवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हाकामाताने अटक केल्यानंतर सुरुवातीला सर्व आरोप फेटाळले होते, परंतु नंतर आरोप मान्य केले. हाकामाता यांना पोलिसांनी मारहाण केली होती. त्यांना आरोपाची कबुली देण्यात पोलिसांनी भाग पाडले होते. पीडितांच्या कपडय़ांवर सापडलेला डीएनए हाकामाताच्या डीएनएशी जुळत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आरोप करण्यासाठी खोटे पुरावे तयार करण्यात आले.
भावासाठी बहीण आली धावून
हाकामाताला अटक केल्यानंतर भाऊ निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी हाकामाताची बहीण हिदेको धावून आली. तिने वर्षानुवर्षे पुरावे गोळा केले. यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले. बहिणीने कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे हाकामाताची न्यायालयाने 2014 मध्ये तुरुंगातून सुटका केली. तुरुंगातून भावाची सुटका कधी होते, याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होते, असे हाकामाताच्या बहिणीने सांगितले.