
कर्नाटकच्या मंगळुरू येथील तुरुंगातील 45 कैद्यांना अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने हडकंप उडाला. बुधवारी सायंकाळी कैद्यांना हा त्रास सुरू झाल्याने तुरुंग प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तुरुंग प्रशासनाने सर्व कैद्यांना सरकारी वेनलॉक रुग्णालयात दाखल केले आहे. या कैद्यांवर उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांनी बुधवारी सकाळी पोह्याचा नाश्ता केला होता आणि दुपारी भात-सांबर असे खाल्ले होते. त्यानंतर सायंकाळी साडे चारच्या सुमारास कैद्यांना पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. बघता बघता जवळपैस 45 कैद्यांना हा त्रास झाला. यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंगळुरुचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि कैद्यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. सध्या एक कैदी सोडून इतर सर्वांची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभागाच्या पथकाने तुरुंगातील कैद्यांचे पिण्याचे पाणी, सकाळचा नाश्ता आणि जेवणाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत, असे अनुपम अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तुरुंगात 350 कैदी
मंगळुरुतील तुरुंगामध्ये जवळपास 350 कैदी आहेत. यापैकी 45 कैद्यांची तब्येत अचानक बिघडली. एकाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून इतर सर्वांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर विषबाधा झाली की अन्य काही प्रकार आहे याचे कारण स्पष्ट होईल.