रेडिओ सिटीवरील जाहिरातींसाठी सरकारकडून 44 कोटींचा चुराडा

मिंधे सरकारच्या राजवटीत प्रचार आणि प्रसिद्धीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केली गेली. 2024-25 या वर्षाकरिता केवळ एफएमवरील रेडिओ सिटीवरून करण्यात आलेल्या जाहिरातींवर तब्बल 44 कोटी रुपये खर्च होत आहेत. एकूण खर्चापैकी 60 टक्के म्हणजेच 26 कोटी 40 लाख रुपये इतका निधी आज वित्त विभागाने उपलब्ध करून दिला. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. रेडिओ सिटीची 2018-19 ची 22 कोटी 17 लाखांची थकबाकीही त्यातून देण्यात येणार आहे. मिंधे सरकारच्या काळात अनेक योजना जाहीर केल्या गेल्या. शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा योजनांची मोठय़ा प्रमाणात जाहिरात केली गेली. लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी प्रसारमाध्यमांबरोबरच एसटी बसेस, लोकल गाडय़ा, बसेस, बस स्थानकांवर केली गेली. त्या एका योजनेच्या जाहिरातीसाठी 270 कोटी 5 लाख रुपये मंजूर केले गेले.