वेटिंग लिस्टमधील 406 जणांना घराची लॉटरी, म्हाडा मुंबई मंडळाची सोडत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीमधील 442 विजेत्यांनी विविध कारणात्सव घरे सरेंडर केली होती. त्यापैकी प्रतीक्षा यादीवरील 406 विजेत्यांना म्हाडाने सोमवारी स्वीकृती पत्र पाठवले आहे. या अर्जदारांना घरांची स्वीकृती करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

म्हाडाने 8 ऑक्टोबर रोजी 2030 घरांसाठी सोडत काढली होती. त्यापैकी 13 घरांना कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. सोडतीमधील विजेत्यांपैकी 442 जणांनी डोमेसाईल सर्टिफिकेट नसणे, एकाहून अधिक घरे लागणे अशा विविध कारणास्तव घरे सरेंडर केली. त्यामुळे सरेंडर झालेल्या घरांपैकी 406 घरे प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना म्हाडाने स्वीकृती पत्र म्हाडाने पाठवले आहे.

पुढील 15 दिवसांत विजेत्यांना अॅप किंवा वेबसाईटवरून घर स्वीकारायचे किंवा नाकारायचे आहे. घर स्वीकारल्यानंतर विजेत्याला म्हाडाकडून तात्पुरते देकारपत्र पाठवण्यात येणार आहे.

अवघ्या 135 विजेत्यांनी भरले पैसे

मुंबई मंडळाच्या सोडतीमधील ज्या इमारतींना निवासी दाखला प्राप्त झाला आहे अशा 358 विजेत्यांना म्हाडाने तात्पुरते देकारपत्र पाठवले असून त्यांना घराच्या विक्री किमतीच्या 25 टक्के रक्कम भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत 10 डिसेंबरला संपणार आहे. आतापर्यंत केवळ 135 जणांनीच पैसे भरले आहेत, अशी माहिती मुंबई मंडळाकडून देण्यात आली.