
गेल्या तीन महिन्यांपासून चार सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 वरिष्ठ निरीक्षक मिळून 40 पोलीस अधिकारी मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘झाडाखाली’ आहेत. जागा रिक्त असूनही त्यांना ना पोस्टिंग, ना वेळेवर पगार मिळत असल्याने या अधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. टेंडर भरले नाही म्हणून या अधिकाऱ्यांना पोस्टिंगविना खितपत ठेवण्यात आले आहे का? अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
मुंबईसारख्या शहरात पोलीस दलात अलीकडच्या काळात टेंडर भरणाऱ्या अधिकाऱ्यांनाच पोस्टिंग मिळते, असे एकंदरीत चित्र असल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. मात्र याचा अन्य अधिकाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यापासून शहरातील चार एसीपी, 10 वरिष्ठ निरीक्षकांसह जवळपास 40 अधिकारी झाडाखाली आहेत. जागा रिक्त असतानाही अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती केली जात नसल्याने पोलीस दलात खदखद व्यक्त होत आहे. टेंडर भरण्यासाठी कोणी येतोय का? याची वाट तर पाहिली जात नाही ना? असा सवाल अधिकारी, कर्मचारी उपस्थित करत आहेत. रिक्त जागा भरल्या जात नसल्याने त्याचा अन्य अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण देखील पडत आहे.
कुठल्या जागा रिक्त…
एसीपी – आझाद मैदान, डीएन नगर, वाकोला विभाग, समाजसेवा शाखा (गुन्हे शाखा).
वरिष्ठ निरीक्षक – यलोगेट, विमानतळ, नवघर आदी पोलीस ठाणी वरिष्ठ निरीक्षकांविना आहेत.
तीन महिन्यांनी पगार
डिसेंबरपासून हे अधिकारी झाडाखाली आहेत. परिणामी त्यांना पगार मिळणे देखील मुश्कील झाले आहे. तीन महिन्यांनंतर गेल्या आठवड्यात या अधिकाऱ्यांना पगार देण्यात आला. असे करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न अधिकारी विचारत आहेत.