MPSC Exam – संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी, परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी; विद्यार्थ्यांची मागणी

संयुक्त गट ‘ब’च्या परीक्षेची आम्ही परीक्षेपूर्वी एक दिवस अगोदर प्रश्नपत्रिका देतो, असे सांगून 40 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची मागणी एका ऑडिओ क्लिप या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तीन दिवसांवर येवून ठेपलेली संयुक्त पूर्व परीक्षा तात्काळ पुढे ढकलून या व्हायरल ऑडिओ क्लिपची आयोगाने सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिप सोशल मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी कथित विद्यार्थ्याला एका एजंटने कॉल केला. कथित विद्यार्थ्याने आपण बोलताय कोण? रात्र झाली. किती वाजलेत? यावेळी दूरध्वनीवरून एजंटने तुमची डॉक्युमेंट आम्हांला प्राप्त झाली आहे. परीक्षेपूवी एक दिवस अगोदर आम्ही तुम्हाला पेपर देतो. त्यानंतर आम्हाला तुम्ही 40 लाख रुपये द्या. तुम्ही इच्छूक आहात का? ते आम्हांला सांगा. यावर कथित उमेदवाराने, ‘रिस्क तर नाही ना?’, असा सवाल उपस्थित करताच एजंटने तुम्ही कोणाला सांगू नका, असे सांगितले. तुम्हाला आम्ही स्वतःहून पेपर देत असल्याचे सांगितले. तुमचे सर्व फायनल झाले की, आम्हाला पैसे पाहिजे.

कथित उमेदवाराने एजंटच्या नावाची मागणी करताच दादा नाव सांगू शकत नसल्याचे एजंटने सांगितले. तसेच आम्ही तुम्हाला सर्व काही देत आहे. जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे नकोत. यावर कथित उमेदवाराने एजंटला तुम्ही माझे मित्र तर नाही ना?, अशी विचारणा करताच आपण कोणी मित्र नसल्याचे सांगितले. या गंभीर प्रकरणाची राज्य शासन आणि एमपीएससी आयोगाने दखल घेऊन 2 फेब्रुवारी रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा तात्काळ पुढे ढकलून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.