
जिह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. साधारणतः आत्महत्यांच्या कारणांमध्ये कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, नापिकीमुळे अशी सांगितली जातात. यंदा 120 टक्के पाऊस पडल्यावरही जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विदारक चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने 40 पैकी तीनच मदत प्रस्ताव मंजूर केले, तर 26 मदत प्रस्ताव प्रलंबित आहेत. यात 11 प्रस्ताव अपात्र म्हणून फेटाळल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
सन 2024 मध्ये एकूण 168 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यातील 96 शेतकरी पात्र ठरले, तर 72 अपात्र ठरले. गिरणा, तापी, वाघूर नद्यांमुळे जिह्यात काही भाग सिंचनाखाली आहे. त्यात केळी, कापूस, मका व सोयाबीन असे बागायती, तर अन्य भागांत ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तूर, कोरडवाहू कपाशी, असे जिरायत उत्पन्न घेतले जाते. अतिपाऊस वा पावसाचा खंड, नापीक जमीन, वाढता उत्पादन खर्च व हाती आलेल्या उत्पन्नाला भाव नाही. हंगामावर परतफेडीच्या बोलीवर सावकारांकडून कर्जफेडसाठी तगादे, कुटुंबाचे आजारपण, मुलांचे शैक्षणिक खर्च, मजुरांना वाढीव मोबदला देऊनही मजूर न मिळणे अशा अनेक कारणांमुळे आर्थिक कुचंबना, कर्जबाजारीपणा अशा दुष्टचक्रात अडकलेल्या 168 शेतकऱ्यांनी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान आत्महत्या केल्याची नोंद आहे.
तालुका पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील वा पोलीस डायरीत पंचनामा नोंदी झाल्या आहेत. त्यात तहसीलदार स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीसमोर जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान 168 प्रस्ताव आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी सादर केले. त्यात जिल्हास्तरीय समिती सदस्य व अध्यक्षांकडून 96 मदत अनुदान प्रस्तावांना मान्यता दिली. 72 प्रस्ताव अपात्र असल्याने नामंजूर केले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाच्या निकष निर्देशानुसार पात्र असलेल्या मदत प्रस्तावांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत अनुदान देण्यात येते. पात्र असलेल्या प्रस्तावांना प्रत्येकी एक लाख रुपयेप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर दरम्यान 96 लाख रुपये मदत अनुदान मंजूर करीत संबंधित वारसांच्या नावे बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.