11 वर्षात पालघरमध्ये 4 हजार बालकांचा मृत्यू, कुपोषण, बालविवाहाचा कलंक

पालघर जिल्ह्यात 11 वर्षांत 4094 बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू तलासरी व वाडा अशा ग्रामीण भागांमध्ये कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण सार्वधिक आहे. या मृत्यूला कुपोषण, बालविवाह आणि मुदतपूर्व प्रसूतीचा कलंक कारणीभूत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बालके किंवा माता परजिल्ह्यात दगावली तर त्यांची नोंद जिल्ह्यात होत नसल्याने आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये बालविवाहसारख्या अनिष्ट रूढी, परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. न्यायालयानेही यासंदर्भात राज्य शासनाला फटकारले होते. बालविवाहामुळे कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू हे मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुदतपूर्व प्रसूती होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते थांबवण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

आजारांचा विळखाही कारणीभूत

पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू तलासरी व वाडा अशा ग्रामीण भागांमध्ये कमी दिवसात जन्मलेली बालके दगावल्याची संख्या लक्षणीय आहे. तर मुदतपूर्व प्रसूती, जन्मतः श्वासोच्छ्वास कोंडून, तीव्र फुप्फुस विकार, अपघात, जन्मतः व्यंग, जंतू संसर्ग, प्राणी व सर्पदंश, हृदयविकार, ताप, डायरिया, अतिसार, हायपोथरमीया, पचनसंस्था दोष, दमा, मेंदूज्वर अशा आजारांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.