मोठी दुर्घटना! दिल्लीत रहिवासी इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील दयालपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या शक्ती विहार भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्री रहिवासी इमारत कोसळली. मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भागात ही दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री तीनच्या सुमारास ही रहिवासी इमारत कोसळली. याची माहिती मिळताच एनडीआरएफ, दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, डॉग स्क्वॉडने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले.

या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप लांबा यांनी दिली. मृतांची ओळखही पटली असून चांदनी, दानिश, रेशमा आणि नावेद अशी त्यांची नावे आहेत. तसेच आतापर्यंत 18 लोकांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले असून यापैकी 14 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.