Uttarakhand Avalanche : हिमकड्याच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या चार कामगारांचा मृत्यू, पाच जण अद्याप बेपत्ता

उत्तराखंड- मधील चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ हिमकडा कोसळून त्याखाली 25 कामगार गाडले गेले होते. त्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी या भागात युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू होतं. या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांपैकी चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. अद्याप या ठिकाणी पाच कामगार अडकलेले असून त्यांना शोधण्यात येत आहे.

शुक्रवारी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ एक मोठा हिमकडा कोसळला. या हिमकड्याच्या ढिगाऱ्याखाली बर्फ बाजूला करणारे 57 कामगार गाडले गेले. यापैकी 32 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर उर्वरित 25 कामगारांचा शोध सुरू होता. त्यातील 20 कामगारांना आज बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरू असून लष्कराचे सहा हेलिकॉप्टर घटनास्थळी तैनात आहेत. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या सर्व जखमी कामगारांना जोशीमठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.