बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; 4 जवानांचा मृत्यू

जम्मू-कश्मीरच्या बडगावमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस तब्बल 40 फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये 36 जवान प्रवास करत होते. यापैकी चार जवानांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. 26 विधानसभा मतदारसंघांत होणार असलेल्या मतदानासाठी जवानांची तुकडी रवाना होत होती. दरम्यान, घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने सुरक्षा दलाने बचाव कार्य सुरू केले.

संशयित दहशतवाद्यांशी चकमक

रियासी जिह्यात शिकारी भागात सुरक्षा दलाचे पथक आणि संशयित दहशतवादी यांच्यात शुक्रवारी रात्री चकमक उडाली. चासना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा पथकांनी आज दुपारी एकच्या सुमारास शोधमोहीम सुरू केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम सुरू असताना रात्री दहशतवाद्यांशी सामना झाला आणि काही काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. सुरक्षा दले या दहशतवाद्यांचा माग काढत आहेत.