बहुचर्चित बाबाजी दाते महिला बँक 2.5 अब्ज रुपये अपहार प्रकरणी अखेर 4 जणांना अटक

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरण, कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तांचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठे कर्ज उचलून फसवणूक केल्याने बँक डबघाईस आली. तसेच ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले. या प्रकरणात 2022 पासून चौकशी सुरू होती. 2.5 अब्ज अपहार प्रकरणी अखेर आर्थिक गुन्हे शाखेने 4 जणांना अटक केली आहे.

बाबाजी दाते महिला बँकेतील 242 कोटीच्या अपहार प्रकरणात जबाबदार असलेल्या चौघांना एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली. सुजाता महाजन, विलास महाजन, वसंत मोरलीकर, किशोर मालाणी, असे चौकशीकरिता ताब्यात घेतलेल्यांची नावेे आहे. आता चौकशीत काय घबाड बाहेर येईल, ही येणारी वेळच सांगेल. यावरून कर्जबुडव्यांच्या अटकेच्या काऊंटडाऊनला सुरवात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

परिवाराशी निगडित असलेली महिला अर्बन बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने सदर बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. या बँकेत सुमारे अडीच अब्ज रुपयाचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे . नडल्या गेलेल्या सामान्य सभासदांचे लक्ष गैरव्यवहारातील दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे लागले होते. गुंतवणूकदारांच्या रेट्यानंतर या प्रकरणी विलंबाने का होईना गुन्हे नोंदविले गेले .अखेर आज एसआयटीच्या पथकाने 4 जणांना अटक केली.

या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपविण्यात आलेली आहे. या पथकाने चौघांना चौकशीकरिता ताब्यात घेतले असून, आणखी काही जण टप्प्यात आलेले आहे. त्या सर्वांना लवकरच ताब्यात घेतल्या जाईल – कुमार चिंता, जिल्हा पोलिस अधीक्षक, यवतमाळ.