पुन्हा जिंकलो रे! हिंदुस्थानचा हरारेत झिम्बाब्वेवर सलग दुसरा विजय

सलामीच्या लढतीत पराभूत झालेला हिंदुस्थान हरारेत पुन्हा जिंकला. तिसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. कर्णधार शुबमन गिलचे अर्धशतक, ऋतुराज गायकवाडची फटकेबाजी आणि वॉशिंग्टन सुंदरची भन्नाट गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. तीन विकेट टिपणारा सुंदर या विजयाचा शिल्पकार ठरला.

हिंदुस्थानच्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव 6 बाद 159 धावांवर मर्यादित राहिला. हिंदुस्थानकडून आवेश खान व खलील अहमद यांनी आघाडीची फळी झटपट तंबूत पाठविली, तर वॉशिंग्टन सुंदरने मधली फळी कापून काढली. झिम्बाब्वेची एक वेळ सात षटकांत 5 बाद 39 अशी दुर्दशा झाली होती, मात्र मधल्या फळीतील डायन मायर्सने नाबाद 65 धावांची खेळी करीत हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्याने क्लाइव्ह मदांडेच्या (37) साथीत सहाव्या विकेटसाठी 57 चेंडूंत 77 धावांची भागीदारी केली. मदांडे बाद झाल्यानंतर मायर्सने वेलिंग्टन मसाकादझाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 21 चेंडूंत 43 धावांची अभेद्य भागीदारी करीत झिम्बाब्वेला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. हिंदुस्थानकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तान फलंदाज बाद केले. आवेश खानला दोन, तर खलील अहमदला एक बळी मिळाला.

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 4 बाद 182 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यशस्वी जैसवाल (36) व कर्णधार शुबमन गिल (66) यांनी 50 चेंडूंत 67 धावांची सलामी दिली. जैसवालने 27 चेंडूंत 36 धावा करताना चार चौकारांसह दोन षटकार ठोकले, तर गिलने 49 चेंडूंत 66 धावा करताना सात चौकारांसह तीन षटकार लगावले. सिपंदर रझाने जैसवालला बेनेटकरवी झेलबाद करून झिम्बाब्वेला पहिले यश मिळवून दिले. सिपंदरने पुढच्याच षटकात आलेल्या अभिषेक शर्माला (10) लवकर बाद करीत झिम्बाब्वेला मोठे यश मिळवून दिले. कारण याच अभिषेकने मागील लढतीत वादळी शतकी खेळी केली होती. त्यानंतर गिल व आलेला ऋतुराज गायकवाड (49) यांनी तिसऱया विकेटसाठी 44 चेंडूंत 72 धावा फटकाविल्या. ब्लेसिंग मुझरबानीने गिलला बाद केले. अवघ्या एका धावेने अर्धशतक हुकलेल्या ऋतुराजने 28 चेंडूंत चार चौकारांसह तीन टोलेजंग षटकार लगावले. मुझरबानीनेच त्याची विकेट घेतली. त्यानंतर संजू सॅमसन 12, तर रिंकू सिंग एका धावेवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून सिपंदर रझा व ब्लेसिंग मुझरबानी यांनी दोन-दोन विकेट मिळवले.