38th National Games – राफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची प्रथमच रुपेरी कामगिरी, कर्नाटकने पटकावले सुवर्ण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा धमाका सुरू आहे. स्पर्धेत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या धाडसी राफ्टिंग खेळातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी धमाकेदार खेळ करत रुपेरी यशाला गवसणी घातली आहे. त्याचबरोबर कर्नाटकने सूवर्ण आणि हिमाच प्रदेशने कांस्यपदक पटकावले.

नेपाळ बार्डर जवळील बूम मंदिर नदीच्या किनार्‍यावर सुरू असलेल्या राफ्टींग प्रकारात देवेंद्र कुमार, राखी गेहलोत, कौशिक कुमार व वैष्णवी शिंपी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने सात किलोमीटर शर्यतीत पदकासाठी शर्थ केली. 35 मिनिटे 31.761 सेकंदात शर्यत पूर्ण करीत महाराष्ट्राने दुसरे स्थान संपादन केले. कर्नाटक संघाने ही शर्यत 34 मिनिटे 7.967 सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. हिमाचल प्रदेशच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली.

सांघिक मिश्र प्रकारात महाराष्ट्र संघाने चमकदार करीत प्रथमच राफ्टींग प्रकारातील पदक जिंकण्याचा पराक्रम केला. सात किलोमीटर शर्यत तेलागंणा, दिल्ली, हरयाणा, हिमाचल प्रदेश, चंदिगड, उत्तराखंड, कर्नाटकासह 8 संघात शर्यत रंगली. सुरूवातीपासून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसरे स्थान कायम राखत रूपेरी यशावर नाव कोरले. पात्रता फेेरीतच महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर होता. महाराष्ट्र संघास कर्नल सचिन निकम व संघ व्यवस्थापक विनोद नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

रौप्यपदक विजेत्या महाराष्ट्राच्या संघात पुण्याच्या वैष्णवी शिंपीने चमकदार कामगिरी केली. “हा धाडसी खेळ राष्ट्रीय स्पर्धेत असल्याने मी खेळण्यासाठी उत्सुक होते. सांघिक खेळ केल्याने आम्ही पदक जिंकू शकलो. महाराष्ट्रासाठी हे स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेच पदक जिंकण्याचा आनंद मोठा आहे.” असे पदक विजेती वैष्णवी म्हणाली.