38th National Games – जिमनॅस्टिकमध्ये महाराष्ट्राची पदकांची लयलूट, अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकारासह एका रौप्य

>>विठ्ठल देवकाते

गतवर्षीच्या विजेत्या महाराष्ट्राने जिमनॅस्टिकमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 15व्या दिवशी पदकांची लयलूट केली. जिमनॅस्टिकच्या अक्रोबॅटिक प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तालबद्ध, सुरबद्ध आणि जबरदस्त बॅलन्स राखत अचंबित करणाऱ्या रचना सादर करुन चार सुवर्णपदकांसह एक रौप्य अशी पाच पदकांची लयलूट केली. रिदमिक्सच्या सांघिक गटातही महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर ट्रॅम्पोलिनमध्ये एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकांची कमाई करीत पदकतक्त्यातील आपले दुसरे स्थान आणखी बळकट केले.

महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे व निक्षिता खिल्लारे या महाराष्ट्राच्या जोडीने जबरदस्त बॅलन्स आणि अचंबित करणाऱ्या रचना सादर करून 51.250 गुणांची कमाई करीत सुवर्णपदक खेचून आणले. पश्चिम बंगालला 44.700 गुणांसह रौप्य व केरळने 43.500 गुणांसह कांस्यपदक जिंकले. ऋतुजा आणि निक्षिता दोघीही मुंबईच्या असून, राहुल ससाणे व प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील श्री नारायणराव आचार्य विद्या निकेतन शाळा, चेंबूर येथे सराव करतात. ऋतुजाचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक असून, निक्षिताचे हे पहिलेच पदक होय.