महाराष्ट्राची अद्वितीय कामगिरी; पदक तालिकेत दुसर्या क्रमांकावर मुसंडी

विठ्ठल देवकाते
हल्दवानी, दि. 10 – 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रारंभापासून रौप्य आणि कांस्य पदक विजयात अव्वल असलेल्या महाराष्ट्राने आज सायकलिंग व तायक्वांदो स्पर्धेत सोनेरी कामगिरी करत पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे. गतस्पर्धेतही महाराष्ट्राने दुसरे स्थान राखले होते. आताही 32 सुवर्णासह 46 रौप्य आणि 48 कांस्य जिंकत सर्वाधिक 126 पदके जिंकली आहेत सेनादलाचा संघ 45 सुवर्ण पदकांसह एकूण 80 पदके जिंकून अव्वलस्थानी कायम आहे. विशेष म्हणजे कर्नाटकही 32 सुवर्णांसह महाराष्ट्राच्या मागावर आहे.

तलवारबाजीत श्रुती जोशीला कांस्य पदक
हल्दवानी: महाराष्ट्राच्या श्रुती जोशीने कांस्य पदक पटकावून तलवारबाजीत पदकाचे खाते उघडले श्रुतीने हरयाणाच्या मंजूवर 150 2 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. जम्मू-कश्मीरच्या श्रेयावर 15 10 गुणांनी मात करून तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली. सुपर 8 लढतींत छत्तीसगडच्या वेदिका खुशीवर तिने 15-10 गुणांनी मात करून पदक निश्चित केले उपांत्य फेरीत तामीळनाडूच्या भवानी देवीने श्रुतीवर 10-15 अशी मात केली. त्यामुळे श्रुतीला कांस्यावर समाधान मानावे लागले.

माऊंटन बायकिंगमध्ये प्रणीताला सुवर्ण
• सातताल : माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने सुवर्ण पदकाची भरारी घेतली. प्रथमच समाविष्ट झालेल्या या खेळातही महाराष्ट्राने पदकांची कमाई केली आहे. क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात प्रणिताने चमकदार कामगिरी केली. 46 मिनिटे 26.823 सेकंदांत चुरशीच्या शर्यतीत बाजी मारत सुवर्ण पदक पटकावले. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये प्रशिक्षक नितीन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाद्वारे प्रणिताचा सराव सुरू असतो.

ज्युदोत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेचे सुवर्ण यश
डेहराडून : ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडे हिने सुवर्ण पदक, तर आकांक्षा शिंदे हिने रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 52 किलो गटात श्रद्धाने अंतिम लढतीत मेहरुख मकवाना या गुजरातच्या खेळाडूवर एकतर्फी विजय मिळविला. 48 किलो गटाच्या अंतिम लढतीत आकांक्षाने उत्तर प्रदेशच्या अस्मिता डे हिला कडवी लढत दिली. आकांक्षाने गुण मिळविण्यासाठी जिवाचे रान केले मात्र बचावात्मक पवित्रा घेतलेल्या अस्मिताने आकांक्षाला गुण मिळणार नाही याची दक्षता घेत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली