गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुस्साट सुरूवात केली. महाराष्ट्राच्या महिला संघाने सलामीच्या लढतीत यजमान उत्तराखंडचा 37-14 असा 23 गुण व 1 डाव राखून धुव्वा उडविला, तर पुरुष संघानेही उत्तराखंडला 37-22 असे 15 गुण व एक डावाने हरवित आपल्या विजयाची सुरुवात केली.
गौलापूर येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेल्या खो-खो स्पर्धेत प्रियांका इंगळेच्या अष्टपैलू खेळामुळे (2.20 मिनिटे नाबाद व 2.10 मिनिट संरक्षण व 8 गुण) महिला संघाने उत्तराखंडवर 37-14 असा 23 गुण व 1 डाव राखून दणदणीत विजय मिळविला. अश्विनी शिंदे (2.30 मि.) व सानिका चाफे (2.20 मिनिटे) यांनी प्रियंकाला संरक्षणात तोलामोलाची साथ दिली. उत्तराखंडची कर्णधार भारती गिरीने एक मिनिटे संरक्षण करीत तगडय़ा महाराष्ट्राला एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला.
पुरुष गटातही महाराष्ट्राने उत्तराखंडला 37-22 असे 15 गुण व एक डावाने नमविले. यात रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ करताना आपल्या धारदार आक्रमणात 8 गडी बाद करीत संरक्षणात 1.46 मिनिटे पळतीचा खेळ केला. अनिकेत चेंदवणकरने 2.10 मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. उत्तराखंडकडून पिन्स कश्यप व राहुल शर्मा यांनी प्रत्येकी 6 गडी बाद करीत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.