38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – टेनिसमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण यशाला गवसणी

सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकर जोडीने गुजरातला 2-0 ने नमवून 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेनिसमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. आकांक्षा व वैष्णवीने एकेरीचा प्रत्येकी एक सामना जिंकला. आकांक्षा हिने एकेरीच्या पहिल्या लढतीत झील देसाईवर 6-3, 3-6, 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्राला या सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळाली. वैष्णवीने वैदेही चौधरीचा 6-3, 6-3 असा पराभव करत महाराष्ट्राच्या सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले.

आकांक्षाने पहिल्या सेटमध्ये पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत सर्व्हिस ब्रेक मिळविला. दुसऱया सेटमध्ये तिला स्वतःच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही, मात्र तिसऱया सेटमध्ये पुन्हा आकांक्षाला सूर गवसला. शेवटपर्यंत नियंत्रण कायम राखत आकांक्षाने लढत जिंकून महाराष्ट्राला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. वैष्णवीने वैदेहीविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच नियंत्रण कसे राहील याचे नियोजन केले होते. पहिल्या सेटमध्ये बेसलाईनवरून परतीच्या खणखणीत फटक्यांबरोबरच तिने बिनतोड सर्व्हिसचा बहारदार खेळ केला.

कोमल, संजीवनी, तेजसवर पदकांची मदार

डेहराडून – आंतरराष्ट्रीय खेळाडू कोमल जगदाळे, संजीवनी जाधव, तेजस शिरसे यांच्यावर महाराष्ट्राच्या अॅथलेटिक्समधील पदकांची मदार आहे. मैदानी स्पर्धांना शनिवारी राजीव गांधी क्रीडा संकुलात प्रारंभ होत आहे. कोमल जगदाळे ही स्टीपलचेस क्रीडा प्रकारातील अव्वल दर्जाची खेळाडू असून संजीवनी जाधव ही लांब अंतरांच्या शर्यतीत अनुभवी खेळाडू आहे. पुरुष गटात तेजस शिरसे हा हर्डल्स प्रकारातील माहीर खेळाडू आहे. त्याच्याबरोबरच सिद्धांत थिंगालिया, कार्तिक करकेरा, एकनाथ त्रिंबके, जय शहा हेदेखील पदकाचे दावेदार आहेत.

तायक्वांदोमध्ये पदक सप्तमी

हल्दवानी – महाराष्ट्राने तायक्वांदोमध्ये मिश्र दुहेरी सुवर्णांसह 2 रौप्य, 4 कांस्य पदकांची कमाई करीत दिवस गाजविला. वंश ठाकूर व मृणाली हर्नेकर जोडीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. वैयक्तिक प्रकारात मृणालीने रौप्य, तर वंश पदक जिंकले आहे. शिवानी भिलारेने रौप्य, तर साक्षी पाटील, अभिजित खोपडे, वसुंधरा छेडे यांनीही कांस्य पदकांची लयलूट केली. मिश्र पुमसे प्रकारात वंशसोबत मृणालीने अरुणाचल प्रदेशच्या जोडीवर मात केली. महाराष्ट्राने 8.233 गुणांची मजल घेत सुवर्ण पदकावर नाव कोरले. वैयक्तिक पुमसे प्रकारात मृणाली हर्नेकरने रुपेरी यश संपादन केले. अरुणाचल प्रदेश विरुद्ध महाराष्ट्राची लढत 8.232 गुणांवर बरोबरीत झाला, मात्र अरुणाचलने प्रभावी प्रदर्शन केल्याने पॉइंट 1 गुणांनी महाराष्ट्राचा निसटता पराभव झाला. 57 किलो गटातील उत्तराखंडच्या पूजा कुमारीला महाराष्ट्राच्या शिवानी भिलारेने शेवटपर्यंत लढत दिली. अखेर शिवानीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. वजनी गटात साक्षी पाटील (48 किलो) व अभिजित खोपडे (54 किलो) तर  वैयक्तिक पुमसे प्रकारात वंश ठाकूर  व  वसुंधरा छेडे  या चौघांनीही उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठताना सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर त्यांना कांस्य पदक बहाल करण्यात आले.

कांस्य पदकाच्या एकतर्फी लढतीत बाजी

गौरव चांदणे, रोशन सोळंके, अनिकेत गावडे व पवन जाधव या संघाने तिरंदाजीच्या इंडियन राऊंड प्रकारात कांस्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत भर घातली. पुरुष संघाने कांस्य पदकाच्या लढतीत ओडिशाचा 6-0 असा धुव्वा उडविला.

हॉकीत झारखंडला

महिलांनी बरोबरीत रोखले

हरिद्वार ः बलाढय़ झारखंड संघाला गोलशून्य बरोबरीत रोखून महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. झारखंडने धोकादायक चाली रचत तब्बल 8 पेनल्टी कॉर्नर मिळविले. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षण फळीने त्यांच्या सर्व चाली रोखल्या. महाराष्ट्राचे आता 4 गुण असून साखळी गटातील उर्वरित सामन्यात मणिपूर, मिझोरामच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.

तिरंदाजीत महाराष्ट्राला

सर्वसाधारण उपविजेतेपद

डेहराडून ः सात दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशा एकूण पाच पदकांची लयलूट करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. इंडियन बो प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले. त्यानंतर गौरव चांदणे व भावना सत्यगिरी या जोडीने इंडियन बो या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदकाने स्पर्धेचा गोड शेवट केला.

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला भरघोस पदकांची आशा

डेहराडून ः आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळे, किमया कार्ले यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक संघासाठी शनिवारपासून पदकांचा खजिना उघडणारा आहे. या स्पर्धांमध्ये शनिवारी प्राथमिक फेरीस प्रारंभ होत आहे. रिदमिक या प्रकारात संयुक्त व किमया या अनुभवी खेळाडूंबरोबरच परिणा मदनपोत्रा व शुभश्री मोरे या नवोदित खेळाडूंकडूनही पदकाची आशा आहेत. ट्रम्पोलिनमध्ये राही पाखळे हिच्याकडून वैयक्तिक पदकाची आशा असून सांघिक विभागातही महाराष्ट्राला पदक मिळू शकते. एरोबिक्समध्ये आर्य शहा हा पदकाचा मुख्य दावेदार असून आर्टिस्टिकमध्ये ओंकार शिंदे व सिद्धांत काsंडे यांच्यावर मदार आहे.