अझरबैजान येथून रशियाला निघालेले विमान कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कझाकिस्तानच्या अक्ताऊ येथे घडली. विमानात एकूण 65 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते. मृतांमध्ये दोन्ही वैमानिकांचाही समावेश आहे. विमानातील 32 प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे, तर 22 गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात 2 मुलांचाही समावेश आहे. या मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने टेलिग्रामद्वारे याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या विमान दुर्घटनेमुळे नाताळच्या उत्साहाला गालबोट लागले.
दुर्घटनेची चौकशी करणार
विमान दुर्घटनेची विशेष चौकशी करण्यात येईल असे कजाकिस्तानच्या वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. तांत्रिक बिघाडामुळेही विमान कोसळू शकते, असे सांगण्यात येत आहे. तर पक्ष्यांचा समूह विमानाला धडकल्यामुळेही अपघात घडू शकतो असे रशियन मीडियाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.
जीपीएस जॅमिंगमुळे वैमानिकाचा संदेश पोहोचला नाही
विमानतळावर घिरटय़ा घालत असताना जीपीएस जॅमिंगमुळे वैमानिकाचा संदेश विमानतळ प्राधिकरणापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे वैमानिकाला विमान विमानतळापासून 3 किलोमीटर अंतरावर लँड करावे लागले, परिणामी शेवटच्या क्षणाला विमान लँड करताना ते तिरके झाले आणि जमिनीवर आदळले, असे फ्लाईटरडार 24 ने म्हटले आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर घटनास्थळी 52 फायर फायटर्स आणि 11 बचावपथके रवाना झाली.
नेमके काय घडले?
विमान अजरबैजान येथून रशियाच्या चेचन्या येथील ग्रोज्नी येथे जात होते. त्यासाठी विमानाने बाकू येथून उड्डाण केले; परंतु काही वेळानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने अक्ताऊ येथून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आला होता. कोसळण्यापूर्वी विमानाने विमानतळाला अनेक घिरटय़ा घातल्या. वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. परंतु, विमानतळ प्राधिकरणाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वैमानिकाला विमानतळाजवळ आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंग करताना विमान तिरके झाले आणि जमिनीवर आदळले. यावेळी मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवाशांमधून किंकाळय़ांचा आवाज ऐकू येत होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कोसळलेले विमान अझरबैजान एअरलाइन्सचे असून ते एम्ब्रेयर 190 या प्रकारातील होते. विमान कोसळल्यानंतर क्षणार्धात विमानाने पेट घेतला. दरम्यान, विमानात 37 प्रवासी अझरबैजान येथील होते, 16 रशियन, सहा कझाकिस्तानचे आणि 3 प्रवाशी कीर्गीझस्तानचे होते.