महायुती सरकारकडून 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या, लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद

नागपूर हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने 35 हजार 788 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने लाडकी बहीण योजनचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे वचन दिले होते. ही योजना दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या 21 ते 65 वर्षाच्या महिलांसाठी होती.

लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव हफ्ता कधी येणाक यावरून सरकारडून कुठलीही घोषणा झालेली नाही. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 46 हजार कोटी रुपयांची गरज आहे. सध्या राज्यात अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पुरवण्या मागणी ही अर्थसंकल्पात मांडलेल्या व्यतिरिक्त मागण्या असतात. उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या आज मांडल्या.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडला होता. आता तिथे पुन्हा महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी 36.51 कोटी रुपयांच्या निधीची तरदूत करण्यात आली आहे. तर या पुतळ्याचे कंत्राट सुप्रसिद्ध मुर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. एकूण पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच 7 हजार 490.24 कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यापैकी 3 हजार 195 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला बिनव्याजी देण्यात आले आहेत. हा निधी इमारती, रस्ते आणि पूल बांधण्यासाठी होणार आहे.

पुरवणी मागण्यांपैकी 3 हजार 50 कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अतंर्गत वापरण्यात येणार आहे. तर साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी 1204 कोटी तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना 758 कोटी रुपये कर्ज देण्यासाठी वापरले जाणार आहेत.