हायकोर्टाचा विमान प्रवाशाला दिलासा, एक कोटींच्या सोन्याच्या चेनवरील दंड रद्द; 35 लाख रुपये मिळणार परत

तब्बल एक कोटींचे हिरे जडलेल्या सोन्याच्या चेनवरील 35 लाखांचा दंड उच्च न्यायालयाने रद्द केला. कस्टम विभागाला झटका बसला असून विमान प्रवाशाला दिलासा मिळाला आहे.

राजेंद्र बजाज, असे या विमान प्रवाशाचे नाव आहे. बजाज अमेरिकेचे नागरिक आहेत. अमेरिकेकहून मुंबईत येताना त्यांच्या गळय़ात सोन्याची चेन होती. या चेनची किंमत दहा लाख रुपये आहे. या चेनमध्ये एक कोटी 20 लाख 35 हजार रुपयांचे हिरे जडलेले आहेत. कस्टम विभागाने बजाज यांना विमानतळावर ताब्यात घेतले. या चेनसाठी त्यांच्यावर एक कोटी 20 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. अपिलात दंडाची रक्कम कमी करण्यात आली. त्यांनी दंडाचे 35 लाख रुपये भरले. हे पैसे परत देण्याचे आदेश न्यायालयाने कस्टम विभागाला द्यावेत, अशी मागणी करत बजाज यांनी याचिका दाखल केली.

न्या. के. आर. श्रीराम व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर बजाज यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने बजाज यांची याचिका मंजूर करत चार आठवडय़ांत पैसे परत करण्याचे आदेश कस्टम विभागाला दिले.

काय आहे प्रकरण

बजाज यांचे नातलग हिंदुस्थानात राहतात. ते त्यांना भेटायला मुंबईत येतात. 6 मे 2007 रोजी ते मुंबईत आले. त्यावेळी कस्टम विभागाने विमानतळावर त्यांना ताब्यात घेतले. सोन्याच्या चेनबद्दल चौकशी केली. मी सोन्याचा व्यापारी आहे. ही चेन मी अमेरिकेत घेतली. त्याची पावती आहे. नियमानुसार गळ्यात घातलेल्या चेनवर डय़ुटी लागू शकत नाही. तरीही कस्टम विभागाने दंड आकारला, असा दावा बजाज यांनी याचिकेत केला होता.

न्यायालयाचे निरीक्षण

बजाज यांची चेनची चौकशी करताना उपस्थित असलेल्या पंचांची भूमिका संशयास्पद आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित होतात. गळ्यातील चेनवर डय़ुटी लागू शकते हा कस्टम विभागाचा दावा मान्य केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.