प्रशांत मोरे, काजल कुमारीला जेतेपद

32व्या सीनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने बाजी मारली, तर महिलांच्या गटात इंडियन ऑईलच्या अनुभवी काजल कुमारीने अंतिम विजेतेपद मिळविले.

प्रशांत मोरे आणि राहुल सोळंकी यांच्यात खेळला गेलेला पुरुष एकेरीचा अंतिम सामना तीन सेटपर्यंत रंगला. यात पहिला सेट प्रशांतने 25-10 असा सहज जिंकला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये शिवतारा कॅरम क्लबच्या राहुलने 25-9 अशी मात करत सामन्यात रंगत निर्माण केली. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये सातव्या बोर्डअखेरीस प्रशांतकडे 17-9 अशी 8 गुणांची आघाडी होती; परंतु शेवटच्या क्षणापर्यंत राहुलने हार मानली नाही. त्याने आठवा बोर्ड 7 गुणांचा घेतला, मात्र एका गुणाच्या फरकाने त्याला 16-17 असा अंतिम सेट आणि सामना गमवावा लागला.

महिला एकेरीचा जेतेपदाचा सामनाही संघर्षपूर्ण झाला. या लढतीत काजल कुमारीने पोस्टलच्या रिंकी कुमारीवर 20-12, 25-9, 21-17 अशी थरारक मात केली. पहिला सेट रिंकीने जिंकला, पण पुढे काजलने जोरदार खेळ करत आपले आव्हान कायम राखले आणि रोमहर्षक तिसऱया सेटमध्ये 21-17 अशी मात करत जेतेपदावर आपले शिक्कामोर्तब केले.

पुरुष वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात हाफकिन इन्स्टिटय़ूटच्या पवन मेस्त्रीने विजय कॅरम क्लबच्या गणेश पाटणकरवर रंगतदार तीन सेटमध्ये 25-9, 9-24 व 24-5 असा विजय मिळवून जेतेपद संपादले. तिसऱया क्रमांकाच्या लढतीत सिद्धांत वाडवलकरने सलमान खानला नमवले. महिलांच्या गटात मिताली पाठकने नीलम घोडकेला हरवून तिसऱया क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. विजेत्या खेळाडूंना एकंदर 1 लाख 60 हजारांची रोख पारितोषिके, चषक, मेडल्स व प्रावीण्य प्रमाणपत्रे मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, केतन चिखले, मानद सचिव सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार संजय देसाई, राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, लोकमान्य मंडळ माटुंग्याचे कार्याध्यक्ष मनोहर गोडसे, सुहास बेडेकर व श्रीकांत गोडसे यांच्या हस्ते देण्यात आली.