सफाई कामगारांना आता 300 चौरस फुटांचे घर मिळणार

मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यावण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा देण्यात येतात. त्यामुळे मुंबईच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. सफाई कामगारांच्या 30 वसाहतींचा पुनर्विकास सुरू असून नव्या इमारतींमध्ये 150 फुटांच्या जागी 300 चौरस फुटांचे घर मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील कामगार, कर्मचाऱ्यांसोबत शिवाजी नाटय़ मंदिर येथे संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत सफाई कामगारांसाठी सुरू असलेल्या योजना, सुविधांची माहितीही दिली. तसेच कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, उप आयुक्त प्रशांत सपकाळे, उप आयुक्त किरण दिघावकर, उप आयुक्त प्रशांत तायशेटे आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी कामगार, महिला कामगार, मुकादम, मोटर लोडर, पर्यवेक्षक, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी कामगार करीत असलेल्या कामाचे त्यांनी काwतुकही केले. तर सफाई कर्मचाऱयांच्या गैरहजेरीचे प्रमाण सर्व विभागांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 30 टक्के असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी खंत व्यक्त केली. या गैरहजेरीचा परिणाम एपंदर संपूर्ण यंत्रणेवर होत असल्याचे सांगत हे प्रमाण कमी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बारा हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित सध्या 27 हजार 900 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी 6 हजार 500 सेवा सदनिका देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या माध्यमातून ‘आश्रय’ योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या 46 वसाहतींपैकी 30 वसाहतींचा पुनर्विकास केला जात असून एकूण सुमारे 12 हजार सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. या बहुमजली इमारतींत उद्यान, मनोरंजन पेंद्र अशा अत्याधुनिक सुविधा राहणार आहेत.