मुंबईच्या सेवेत आणखी 300 नव्या लोकल, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची माहिती; रेल्वेकडून 17 हजार कोटींची गुंतवणूक

फाईल फोटो

मुंबईत सध्या साडेतीन हजार लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी 300 लोकल सेवा सुरू करण्यासाठी 17 हजार 107 कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये एकूण 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा झाली. या बैठकीत बोलताना वैष्णव यांनी मुंबईत नव्याने सुरू करण्यात येणाऱया रेल्वे सेवांची माहिती दिली.

या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबईसाठी रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. एकात्मिक सेवा प्रणालीमुळे प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद आणि सुलभ होणार असून महसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

या बैठकीला ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि महामुंबई मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकार शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्र’च्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचे उद्दिष्ट विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट प्रक्रिया एकसंध आणि सुलभ करणे आहे. यासाठी ओपन नेटवर्प फॉर डिजिटल काॅमर्स प्लॅटफॉर्मचा तांत्रिक आधार घेतला जाणार आहे.