गर्लफ्रेंडच्या घरी पाठवले कॅश ऑन डिलिव्हरीचे 300 पार्सल, बॉयफ्रेंडने घेतला ब्रेकअपचा बदला

एका तरुणाला गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप सहन न झाल्याने त्याने रागाच्या भरात गर्लफ्रेंडच्या घरी तब्बल 300 डिलिव्हरीचे पार्सल पाठवले. विशेष म्हणजे हे सर्व पार्सल कॅश ऑन डिलिव्हरी होते. ही घटना कोलकातामधील आहे. गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर तरुणाला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे.

गर्लफ्रेंडच्या सततच्या ऑनलाईन शॉपिंग कारणामुळे या दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते. गर्लफ्रेंडला ऑनलाईन शॉपिंग करू दिली नाही तसेच महागडे गिफ्ट दिले नाही, त्यामुळे तिने माझ्याशी ब्रेकअप केले असे तरुणाने म्हटले आहे. तरुणीला धडा शिकवण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचे 300 पार्सल पाठवल्याची कबुली तरुणाने पोलिसांसमोर दिली. ही तरुणी एका बँकेत नोकरी करते. 300 पार्सल पाठवणाऱ्याचे नाव सुमन सिकदर आहे. या दोघांचे ब्रेकअप नोव्हेंबर 2024 मध्ये झाले होते. ब्रेकअपनंतर रोज एक पार्सल येत होते. एकूण 300 पार्सल आले. सुरुवातीला काही पार्सल घेतले, परंतु काही महागडे असल्याने ते घेतले नाहीत. त्यामुळे कंपनीने तिचे अकाऊंट ब्लॉक केले.