मुंबईतील एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात अडकवून तिला अटक करून तिचा छळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकरणात आंध्र प्रदेशातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या तीघांचे निलंबन करण्यात आले असून पुढील तपास केला जात आहे.
मुंबईतील एक मॉडेल आणि अभिनेत्री कांदबरी जेठवानी हिने एका व्यावसायिका विरोधात लैंगिक घळाचा आरोप केला होता. कुक्काला विद्यासागर असे त्या व्यक्तीचे नाव असून ते वायएसआर काँग्रेसचे नेते आहेत. यांच्याविरोधात तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र ही तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस तिच्यावर दबाव ठाकत होते. तरीही अभिनेत्री तिच्या तक्रारीवर ठाम होती.
अभिनेत्रीला तक्रार मागे घेत नसल्यामुळे तिला आंध्र प्रदेशमध्ये खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणात 2 फेब्रुवारीला तिला आणि तिच्या आईवडिलांना अटक करण्यात आली होती. यानंतर 42 दिवसांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. यादरम्यान दीड महिना अभिनेत्रीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला.
आंध्र प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी करून तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.पीएसआर अंजा नेयुलू, कांथी राणा टाटा आणि विशाल गुन्नी अशी निलंबित करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहेत.