तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू, 60 अत्याव्यस्थ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

तामिळनाडूमधील कल्लाकुरुची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण अत्याव्यस्थ आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

कल्लाकुरुची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एमएस प्रसंथ यांनी विषारी दारू प्यायल्याने अत्यव्यस्थ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची भेट घेतली. सर्व रुग्णांवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच नातेवाईकांनीही गर्दी केली असून मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश काळीज हेलावून टाकत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या के. कन्नुकुट्टी (वय – 49) याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून जवळपास दोनशे लीटर दारू जप्त केली आहे. त्यात जीवघेणे मेथनॉल आढळून आले आहे.

मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर

विषारी दारू प्यायल्याने 29 कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन अॅक्शन मोडवर आले असून याप्रकरणी त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच अशा प्रकारची दुर्दैवी घटना रोखण्यास असमर्थ ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचेही निर्देश दिले आहेत. यासह जनतेने अशा गुन्ह्यात सहभागी लोकांची माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.