मुंबईत दोन हजार 271 रस्ते अपघातांत 289 जणांचा मृत्यू

मुंबई शहरात या वर्षी आतापर्यंत दोन हजार 271 रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात 289 जणांनी जीव गमावला आहे, तर एक हजार 671 जण जखमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत राज्यामध्ये भीषण अपघातांच्या घटना घडल्या. मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी महागडय़ा कारचालकांनी बेभान होत गाडी चालवून भीषण अपघात केले. सोमवारीच कुर्ला पश्चिमेला बेस्ट बसचालकाच्या बेदरकारपणामुळे भयंकर अपघात होऊन त्यात सात जण ठार तर 35 हून अधिक जखमी झाले. वरळी येथे बीएमडब्ल्यू कारने तर वरळी-कोळीवाडय़ातील महिलेला फरफटत नेले होते. हे आणि असे अपघात शहरात झाले. परंतु या वर्षीची आतापर्यंत अपघातांची आकडेवारी पाहता 2271 अपघातांमध्ये 298 जणांना जीव गमवावा लागला असून 1671 जण जखमी झाले. गतवर्षीच्या तुलनेत अपघात आणि त्यातील मृत व जखमींचा आकडा कमी असला तरी या वर्षी भयंकर, अंगाचा थरकाप उडविणारे अपघात शहरवासीयांनी पाहिले. अपघात कमी होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीदेखील नियमांचे पालन केल्यास त्याचा फायदा होईल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते.