भरधाव बस अनियंत्रित झाल्याने इलेट्रिक पोलवर आदळली. या अपघातात 28 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगावजवळ शुक्रवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली.
रात्री मुक्कामी असलेली बस नियमित वेळेप्रमाणे सकाळी 5.30 वाजता शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन लाडली गावातून रवाना झाली. यानंतर रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन बस पाळधीकडे रवाना झाली. मात्र दोनगावजवळ बसचालकाचा भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस इलेक्ट्रीक खांबाला धडकली.
अपघाताची माहिती मिळताच लाडली, रेल आणि दोनगाव गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.