बेहिशेबी रोकड, दारू, सोने-चांदीचे 269 कोटींचे घबाड सरकारी तिजोरीत

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत राज्यात 23 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड तर 17 लाख लिटर दारू, सोने-चांदी मिळून एकूण 269 कोटी रुपयांचे घबाड सरकारी तिजोरीत जमा झाले आहे. आचारसंहितेच्या काळात परवानाधारकांची शस्त्रs ताब्यात घेण्यात येतात. मात्र आतापर्यंत 33 हजारांहून अधिक परवानाधारकांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर-बंदुका सरकारकडे जमा केलेल्या नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांतील माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोकलिंगम यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे यापैकी रामटेकमध्ये एक, नागपूरमध्ये पाच, भंडारा-गोंदियामध्ये दोन, गडचिरोली-चिमूरमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत एकही अर्ज दाखल झालेल नाही.

यानिमित्ताने चोकलिंगम यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यात जप्त करण्यात आलेल्या बेहिशेबी 23 कोटी रुपयांपैकी सर्वाधिक म्हणजे 3 कोटी 50 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड मुंबईच्या उपनगरातून जप्त केली आहे. 43 किलो सोनं, चांदी व इतर मोल्यवान ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

…तर मतपत्रिकेवर मतदान
मराठा आंदोलकांनी प्रत्येक मतदारसंघात 400 हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवण्याचा इशारा दिला आहे. जर एका मतदारसंघात 300पेक्षा उमेदवार असल्यास मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागेल, असे चोकलिंगम यांनी सांगितले.

जाहिराती प्रमाणित करणे गरजेचे
वर्तमानपत्रात एखाद्या राजकीय पक्षाला जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास निवडणूक आयोगाकडून संबधित जाहिरात प्रमाणित करून घ्यावी लागेल. आतापर्यंत दोन जाहिराती निवडणूक कार्यालयात सादर झाल्या आहेत.