एसटीच्या ताफ्यात नवीन 2650 ‘लाल परी’ येणार

राज्याच्या खेडोपाडय़ात धावणाऱ्या एसटीच्या ताफ्यात येत्या नऊ ते दहा महिन्यांत नवीन 2650 ‘लाल परी’ गाडय़ा दाखल होणार आहेत. टप्प्याटप्प्याने या गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून गावागावांत एसटीची उत्तम सेवा दिली जाणार आहे. 30 लाल परी बस मुंबईतील परळ, मुंबई सेंट्रल व कुर्ला आगारामध्ये दाखल झाल्या आहेत. राज्यभरात एसटी महामंडळाचे एकूण 251 डेपो आहेत. या डेपोंमध्ये सध्या एसटी बसची संख्या प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत कमी आहे. अनेक गाडय़ा वारंवार नादुरुस्त होतात. त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने आणखी लाल परी बसेस प्रवासी सेवेत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.