
हिंदुस्थानी नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमानाच्या खरेदीला अखेर मंजुरी मिळाली आहे. हा निर्णय देशाची सुरक्षा समिती कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटी (सीसीएस) ने घेतला आहे. फ्रान्स सरकारसोबत वाटाघाटी केल्यानंतर हे डील पक्के झाले असून लवकरच हिंदुस्थानी नौदलाला 26 नवीन लढाऊ राफेल मिळणार आहे. यासाठी 63 हजार कोटी रुपये मोजले जाणार आहे. या करारांतर्गत नौदलाला 22 सिंगल-सीटर आणि 4 ट्विन सीटर राफेल मरिन जेट मिळतील. तसेच ट्रेनिंग, मेंटेनेंस, पुरवठा सपोर्टच्या पॅकेजचा समावेश आहे. याचाच अर्थ या डीलमध्ये केवळ लडाऊ विमान मिळणार नाही तर उड्डाण आणि त्याची कशी देखभाल करायची यासंबंधीची सविस्तर माहिती मिळणार आहे. फ्रान्सकडून मिळणाऱ्या या राफेल लढाऊ विमानाला हिंदुस्थानचे पहिले स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात केले जाणार आहे.
हे लढाऊ विमान नौदलासाठी खरेदी केले जात असले तरी हिंदुस्थानी वायुदलालाही याचा फायदा होणार आहे. या राफेल मरिन विमानात मोठय़ा प्रमाणात इंधन भरण्याची टेक्नोलॉजी असणार आहे. या टेक्नोलॉजीने एका राफेल विमानातून दुसऱया राफेल विमानात हवेतून इंधन देऊ शकते. यामुळे मिशनचे अंतर कमी होऊन वेळ वाचेल. हीच टेक्नोलॉजी वायुदलातील जवळपास 10 राफेल जेट विमानातही लागू केली जाईल.