
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला घेऊन अमेरिकेतून विशेष विमान रवाना झाले असून उद्या गुरुवारी दुपारपर्यंत हे विमान हिंदुस्थानात दाखल होऊ शकते. राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याचा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला हिंदुस्थानात आणण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या. ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे तीन अधिकारी तत्काळ अमेरिकेत पोहोचले.
हिंदुस्थानात आणल्यानंतर त्याला सर्वात आधी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येण्याची शक्यता असून एनआयए त्याची कोठडी मागू शकते. एनआयए कोठडीत त्याची कसून चौकशी करण्यात येईल. त्यानंतर त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवले जाणार असून नंतर मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कसाब ज्या अंडासेलमध्ये होता तिथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएने मुंबई हल्ल्यावरील खटला मुंबईहून दिल्लीत ट्रान्सफर करून घेतला होता. त्यामुळे आता या खटल्याची संपूर्ण सुनावणी दिल्लीत होणार आहे.
राणावर काय आरोप?
राणा हा लश्कर ए तोयबाचा दहशतवादी असून मुंबईवरील हल्ल्यापूर्वी येथील संभाव्य लक्ष्यांची टेहाळणी करण्याची जबाबदारी डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सैयद गिलानीवर सोपवण्यात आली होती. हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला. राणाचा इमिग्रेशन व्यवसाय होता. त्याचाच ाधार घेऊन त्याच्या पंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभारण्यात आले. त्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. त्याने इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्डेही छापली होती, पण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, व्हिसा किंवा इतर कोणतेही काम झाल्याचे आढळले नाही. एनआयएने याप्रकरणी 25 डिसेंबर 2011 रोजी आरोपपत्र दाखल केले होते.