
मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याला मोठा धक्का बसला आहे. त्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका अमेरिकी कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे हिंदुस्थानकडे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तहव्वूर राणा याने गुरुवारी अमेरिकी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने हिंदुस्थानात पाठवल्यास माझा छळ केला जाईल. ह्यूमन राइट्स वॉच 2023 च्या वर्ल्ड रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आलंय की हिंदुस्थानात भाजप सरकार अल्पसंख्यांकांसोबत विशेष करून मुस्लिमांसोबत भेदभाव करते. सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असून मला हिंदुस्थानकडे सोपवल्यास माझा छळ केला जाईल, असे तहव्वूर राणाने याचिकेत म्हटले होते. तसेच आपल्याला अनेक आजार असल्याचेही त्याने म्हटले होते. मात्र त्याचा हा अंतिम युक्तीवादही कोर्टाने फेटाळून लावला आहे.
US Supreme Court rejects plea of 26/11 Mumbai attack accused Tahawwur Rana, seeking stay on his extradition to India.
— ANI (@ANI) March 7, 2025
काय आहेत राणावर आरोप?
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणाने हल्ल्यातील आणखी एक मास्टरमाइंड डेविड कोलमन हेडलीला मदत केली होती. या हल्ल्यासाठी राणाने मुंबईतील ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास एक वर्षानंतर तहव्वूर राणा याला अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने शिकागोमध्ये अटक केली होती.