>> गणेश राख
पुणे शहर परिसरात शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी तब्बल 2 हजार 532 वाहने कुठल्याही फिटनेसविना रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही सर्रासपणे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील रेस्त्यावर ही वाहने धावत असल्याने अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुणे शहरात जवळपास 6 हजार 368 स्कूल बसेस, व्हॅनची संख्या आहे. तर, पिंपरी चिंचवड शहरात 2 हजार 951 स्कूलवाहने आहेत. या वाहनांमधून रोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीला घेऊन विशिष्ट नियमावली आहे. यात स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या रंगापासून ते आसन क्षमता व वेगावरील मर्यादाही आखून दिली आहे. न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणार्या वाहनांना आरटीओकडून योग्यता प्रमाणपत्र तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे. 15 जानेवारीपासून सर्वच शाळा सुरू झाल्याने पुन्हा एकदा स्कूल बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्कूल बसधारकांनी वाहनांची फिटनेस तपासणी करून घेण्याचे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले होते. फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी स्कूल बसचालकांना सोयीचे व्हावे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही फिटनेस सर्टिफिकेटचे नुतनीकरणाची सोय उपलब्ध करून दिली होती. मात्र, तरीदेखील पुण्यातील शहरातील 6 हजार 368 पैकी 4 हजार 861 स्कूलबस धारकांनी फिटनेस तपासणी करून घेतली आहे. अद्याप 1 हजार 507 वाहनधारकांनी फिटनेस तपासणी केलेली नाही. तर, पिंपरी चिंचवडमधील 2 हजार951 वाहनांपैकी 1 हजार 126 वाहनांची फिटनेस तपासणी झाली आहे. अद्याप 1 हजार 25 वाहनांनी फिटनेस तपासणी केलेली नसल्याचे आरटीओच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या वाहनांना ‘फिटनेस’ प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
फिटनेससाठी सुट्टीच्या दिवशी देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. मात्र, तरीही फिटनेस तपासणी न केलेल्या 852 स्कूल वाहनधारकांना नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.
फिटनेस प्रमाणपत्र न घेतलेल्या सर्व 1 हजार 25 वाहनधारकांना नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत आहे. – संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड.