बेस्टने पुन्हा केला ‘घात’, गोवंडीत 25 वर्षांच्या दुचाकीस्वाराला चिरडले; बस चालकाला अटक

कुर्ला येथे सोमवारी बेस्ट बसचे नियंत्रण सुटल्यामुळे सात जण ठार तर 49 जण जखमी झाले तर बुधवारी सीएसएमटी स्थानकाजवळ एका पादचा ऱ्याचा बसच्या पाठीमागील चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री गोवंडीच्या शिवाजीनगर बस आगारातून कुर्ला येथे निघालेल्या बेस्ट बसने गोवंडी जंक्शनजवळ एका 25 वर्षांच्या दुचाकीस्वाराला चिरडले. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली आहे

गोवंडी बस आगारातून शनिवारी रात्री बेस्टची 375 क्रमांकाची बस कुर्ला बस डेपो येथे जात होती. बसचालक विनोद रणखांबे (39) हे बस चालवत होते तर अविनाश गीते हे बसवाहक होते. बस सव्वाबाराच्या सुमाराला शिवाजीनगर जंक्शन येथे आली असताना विनोद दीक्षित हा 25 वर्षांचा दुचाकीस्वार उजव्या बाजूने गाडीच्या मागील चाकाखाली आला. चाकाखाली आल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घाटकोपर पोलिसांच्या व्हॅनने त्याला तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी बसचालक विनोद रणखांबे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

कंत्राटदारांचा निष्काळजीपणा 

गोवंडीतून 375 क्रमांकाची निघालेली ही बस वेट लीज-बीव्हीजी ग्रुपची असून बेस्टला कंत्राटावर देण्यात आली होती. या आधीच्या दुर्घटनेतील दोन बसही बेस्टने कंत्राटाकडून घेतलेल्या आहेत. बेस्ट बसच्या अपघातांचे सत्र सुरूच असून बेस्टचे कंत्राटदार आणि त्या कंत्राटदारांकडून नेमलेले चालक आणि वाहकांच्या प्रशिक्षणाबद्दल कंत्राटदारांचा निष्काळजीपणा वेळोवेळी दिसून आला आहे.

पाच दिवसांतली तिसरी घटना  

बेस्ट बस अपघाताची गेल्या पाच दिवसांतील ही तिसरी घटना आहे. या आधी सोमवारी कुर्ला येथे आणि बुधवारी सीएसटीएम येथे बेस्टने पादचा ऱ्यांना चिरडले होते. त्यामुळे मुंबईकर बेस्ट प्रवाशांच्या आणि पादचा ऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.