अवघ्या चार तासांत सैफला विम्यातून 25 लाख रुपये मंजूर, चौकशी करण्याची मागणी

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी चाकूने हल्ला झाला होता. त्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. सैफवरील उपचारांवर विमा कंपनीने 25 लाख रुपये दिले होते. आता उपचारांवरचा हा खर्चही वादात सापडला आहे. सैफला इतक्या लवकर आणि उपचारासाठी एवढी मोठी रक्कम कशी काय मिळाली असा सवाल उपस्थित होत आहे. मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनने भारतीय विमा आणि विकास प्राधिकरणला पत्र लिहिले आहे. सैफ अली खान हा सेलिब्रिटी आहे म्हणूनच त्याला विम्याचे पैसे देताना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आल्याचा आरोप मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनने केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. सैफ अली खानने विम्यासाठी अर्ज केल्यानंतर अवघ्या चार तासांत त्याला 25 लाख रुपये मंजूर झाल्याचे एका डॉक्टरांनी सांगितले. कुठल्याही विमाधारकाला एवढ्या कमी वेळेत एवढी मोठी रक्कम मंजूर केली जात नाही. कुठल्याही रुग्णासाठी सुरुवाताली 50 हजार रुपये मंजूर केली जातात. मेडिकल आणि लीगल गोष्टीसाठी विम्याचे पैसे मिळवायला खूप वेळ जातो असेही एका डॉक्टरने सांगितले.

सैफला अवघ्या काही तासांत विम्याचा क्लेम मंजूर होतो ही बाब गंभीर असल्याचे मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनने म्हटले आहे. सेलिब्रिटी, हाय प्रोफाईल आणि कॉर्पोरेट पॉलिच्या रुग्णांना चांगल्या सुविधा आणि पटकन कॅशलेच उपचार मिळतात. तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना कमी क्लेम आणि कमी पैसे मिळतात. सैफ अली सारख्या घटनांमुळे भेद निर्माण होतात असेही मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनने म्हटले आहे.

मेडिकल कन्सल्टंट असोसिएशनचे मेडिकोलीगल सेलचे प्रमुख डॉ. सुधीर नाईक म्हणाले की आम्ही कुठल्याही मोठ्या हॉस्पिटल किंवा सेलिब्रिटीच्या विरोधात नाही. पण मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्येही सामान्य रुग्णांनाही उपचार मिळावे अशी आमची मागणी आहे. IRDA ने याबाबतीत चौकशी करावी आणि सर्व रुग्णांना योग्य उपचार आणि विम्याचा योग्य फायदा मिळावा अशी मागणी केली आहे.