25 जून संविधान हत्या दिन; केंद्राची घोषणा

केंद्र सरकारने 25 जून हा ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. सरकारने राजपत्राद्वारे याबाबतची अधिसूचनाही जारी केली.

25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. लाखो लोकांना तुरुंगात डांबले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता. या पार्श्वभूमीवर त्या दिवसाची आठवण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे अमित शहा यांनी  पोस्टमध्ये लिहिले आहे.

मोदी सरकारच्या काळात रोजच संविधानाची हत्या – खरगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सरकारने रोजच संविधान हत्या दिवस साजरा केला आहे. सरकारने प्रत्येक गरीब आणि वंचितांचा क्षणाक्षणाला आत्मसन्मान हिरावून घेतला, असा हल्ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पेंद्राच्या निर्णयावर चढवला.