
होणाऱ्या नवऱ्यासोबत वॉटर पार्कमध्ये गेलेल्या 24 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दक्षिण दिल्लीतील कापसहेडा भागातील ‘फन अँड फूट व्हिलेज’ वॉटर पार्कमधील रोलर कोस्टर अर्थात झोपाळ्याचा स्टँड तुटल्याने तरुणी खाली कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला. प्रियांका असे तरुणीचे नाव असून शनिवारी (5 एप्रिल) रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून तरुणीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. तसेच संबंधितांवर भादवि कलमांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे.
प्रियांका नावाची तरुणी तिच्या कुटुंबासह चाणक्यपुरीतील विनय मार्ग या ठिकाणी असलेल्या सी-2, 165 येथे रहात होती. ती एका खासगी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर पदावर काम करत होती. फेब्रुवारी 2026 मध्ये तिचे लग्न नजफगढ येथे राहणाऱ्या निखीलशी होणार होते. होणारा नवरा निखील सोबत ती दक्षिण दिल्लीतील कापसहेडा भागात ‘फन अँड फूट व्हिलेज’ वॉटर पार्कमध्ये गेली होती. यावेळी ही घटना घडली आणि प्रियांकाला मृत्युने गाठले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि निखील दक्षिण दिल्लीतील कापसहेडा भागातील ‘फन अँड फूट व्हिलेज’ वॉटर पार्कमध्ये गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी वॉटर राईडचा आनंद लुटला. त्यानंतर दोघेही अॅम्युझमेंट पार्कमध्ये गेले आणि तिथे त्यांनी कोस्टर राईड घेतली. दोघेही राईडमध्ये बसले, मात्र रोलर कोस्टर वर गेल्यानंतर त्याचा स्टँड तुलटा आणि प्रियांका थेट वरून खाली कोसळली. यात गंभीर जखमी झालेल्या प्रियांकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला मणिपाल रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Delhi | A 24-year-old woman, Priyanka lost her life after falling from a roller coaster ride at Fun and Food Village in the Kapashera area of Delhi yesterday. She reportedly lost her balance and fell from the ride, sustaining severe injuries. Despite being rushed to a nearby…
— ANI (@ANI) April 5, 2025
प्रियांका हिचा जानेवारी 2023 मध्ये साखरपुडा झाला होता. फेब्रुवारी 2026 मध्ये ती निखीलसोबत लग्न करणार होती. लग्नापूर्वी कुटुंबाची आर्थिक घडी नीट बसावी म्हणून तिने साखरपुड्यानंतर लगेचच लग्न केले नाही. ती नोएडातील एका खासगी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर पदावर काम कर होती, असे तिच्या कुटुंबाने सांगितले.
वॉटर पार्कमध्ये काय घडलं?
रोलर कोस्टरमध्ये आम्ही सव्वा सहाच्या सुमारास बसलो. रोलर कोस्टर सर्वात उंच बिंदूवर पोहोचल्यानंतर आधारासाठी लावण्यात आलेला स्टँड तुटला आणि प्रियांका खाली कोसळली. शरीरावर जखमा झाल्याने ती रक्तबंबाळ झाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, अशी माहिती निखीलने पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादवि कलम 289 आणि 106 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ‘फन अँड फूड व्हिलेज पार्क’कडून अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.