दिवसभरात 283 किमीचे रस्ते चकाचक; 231 मेट्रिक टन कचरा, डेब्रिज जमा

स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेत आज राबवण्यात आलेल्या मोहिमेत दिवसभरात 283 किमीचे रस्ते चकाचक करण्यात आले. तर तब्बल 231 मेट्रिक टन कचरा-डेब्रिज गोळा करण्यात आले. पालिकेच्या 1332 कर्मचाऱयांनी जोरदार कामगिरी करीत ही कामगिरी केली.

मुंबईत गेल्या 28 आठवडय़ांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण 227 प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत विभाग पातळीवर व्यापक कार्यवाही करण्यात येत आहे. आज झालेल्या ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेत ‘ए’ विभागात बोरा बाजार, सर फिरोजशाह मेहता मार्ग, पेरी नरिमन मार्ग, ‘डी’ विभागात नाना चौक, ताडदेव सर्कल, जावजी दादाजी मार्ग, ‘जी’ दक्षिण विभागात धोबीघाट, सुदाम काळू अहिरे मार्ग, ‘जी’ उत्तर विभागात शाहूनगर, धारावी, ‘एच’ पूर्व विभागात सांताक्रुझ येथे इंडियन ऑईल कंपनी प्रवेशद्वार ते हनुमान टेकडी परिसर, ‘के’ पूर्व विभागात प्रभाग 83 मधील झोपडपट्टी व तत्सम परिसर, ‘के’ पश्चिम विभागात वेसावे येथील मत्स्य पालन विद्यापीठ मार्ग, सुंदरवाडी, ‘एल’ विभागात साकीनाका येथील एस. जे. स्टुडिओ ते खैरानी मार्ग, ‘एम’ पूर्व विभागात सोनापूर मार्ग, ‘पी’ दक्षिण विभागात महात्मास गांधी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, ‘पी’ उत्तर विभागात मालाड पश्चिम येथील जोड रस्ता, ‘आर’ दक्षिण विभागात कांदिवली पूर्व येथे आकुर्ली मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पश्चिम, ‘आर’ मध्य विभागात अमरकांत झा मार्ग, ब्रह्मा विष्णू महेश मार्ग, शिंपोली मार्ग, मल्हाररराव कुलकर्णी मार्ग, ‘टी’ विभागात मुलुंड आदी भागात स्वच्छता करण्यात आली.