वाढदिवशीच आयुष्याचा शेवट! शिकारीच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली, तेलंगणाच्या विद्यार्थ्याचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू

शिकारीच्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी लागल्याने तेलंगणाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आर्यन रेड्डी (वय – 23) असे मृताचे नाव आहे. हृदयद्रावक म्हणजे वाढदिवसाच्या दिवसच त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला.

आर्यन तेलंगणाच्या उप्पलमधील साईराम नगर येथील रहिवासी होता. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेला गेला होता. अटलांटातील जॉर्जिया येथील स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तो शिक्षण घेत होता.

अमेरिकेमध्ये आर्यनने शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीचा परवाना मिळवला होता. 13 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस होता आणि याच दिवशी शिकारीच्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शुक्रवार सायंकाळपर्यंत त्याचे पार्थिव तेलंगणामध्ये येण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना आर्यनचे वडील सुदर्शन रेड्डी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि इतर पालकांनाही सावध केले. परदेशात शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना तिथे शिकारीसाठीच्या बंदुकीचे परवाने मिळू शकता याची आम्हाला कल्पना नव्हती. कोणत्याही पालकांना अशा दिवस पहायला मिळू नये, असे ते म्हणाले.