
ऐतिहासिक ‘विशाळगड अतिक्रमणमुक्त’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी विशाळगड पायथ्याशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी 22 संशयित आरोपींना व्हिडीओ फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी धरपकड सुरू आहे. दरम्यान, विशाळगड व परिसर, तसेच संपूर्ण जिह्यात योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला असून, संपूर्ण जिह्यामध्ये शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे. दरम्यान, विशाळगडावरील 70 अतिक्रमणे आज काढण्यात आली.
आपल्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कायद्याचा सन्मान दाखवूनच आपण शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झालो असल्याचे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. ‘ज्या शिवभक्तांना जबाबदार धरून गुन्हा नोंद केला आहे, त्यापेक्षा मला जबाबदार धरा. माझ्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी त्यांनी केली. पण माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे का? याचे उत्तर पोलिसांनी शेवटपर्यंत दिले नसल्याचे संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी माझ्यावर गुन्हा नोंद करायचा थांबला आहे का?’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.
या आंदोलनाची कल्पना असूनही राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे हिंसाचाराची घटना घडली हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केला आहे.
विशाळगडावरील हिंसाचाराला राज्य सरकारच जबाबदार! संभाजीराजे छत्रपती
ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला रविवारी लागलेल्या हिंसक वळणाचे आपण समर्थन करत नाही. पण हे का घडले, याचे कारण शोधले पाहिजे. याला सर्वस्वी प्रशासन आणि राज्य सरकारच जबाबदार आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावले. दरम्यान, आयुष्यभर शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी राहून जे पुरोगामित्व सोडून महायुतीसोबत गेले; तसेच यासीन भटकळसारखा अतिरेकी जर सात-आठ दिवस विशाळगडावर राहून जात असेल तर पालकमंत्र्यांनी आपल्याला पुरोगामित्व शिकवू नये. दीड वर्ष गडावरील अतिक्रमणे हटविली नाहीत. त्यावेळी तुमचा पुरोगामीपणा कोठे गेला होता. माझा जन्मच छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यात झाला आहे. त्यामुळे तुमचे पुरोगामित्व काय आहे, याचे आत्मचिंतन करा, अशा शब्दांत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खडे बोल सुनावले.